देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय चित्र बदलणार का ?

0
slider_4552

नांदेड :

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, बैठक आणि प्रचाराचा धुरळा उडवला.

अगोदर कमजोर पडलेल्या वंचित च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली आणि मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं. येथील राजकीय चित्र बदलणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. भाजप, कांग्रेस आणि वंचित अशा तिरंगी लढतीत विजयश्री कोण खेचून आणतो यासाठी दोन दिवस वाट पहावी लागणार आहे.

कोरोनामुळे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने ही पोट निवडणूक होत आहे. कांग्रेस कडून रावसाहेबांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर, आयत्यावेळी शिवसेनेतून भाजप मध्ये गेलेले सुभाष साबणे भाजपच्या तिकिटावर, तर वंचित बहुजन आघाडी कडून डॉ.उत्तम इंगोले या तीन प्रमुख उमेदवारांसह इतर 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. तीन लाख मतदार असणाऱ्या या निडणुकीत कांग्रेस, भाजपाने राज्यातले एक आणि दोन क्रमांकाचे सर्वच नेते देगलूर मध्ये प्रचारासाठी आणले. देगलूर च्या इतिहासात न भुतो न भविष्यती एवढे नेते या मतदार संघात येऊन गेले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मात्र स्थानिक मुद्दे बाजूला राहिले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या देगलूर मतदार संघात कमळ फुलवण्यासाठी चव्हाणांमागे इडीची साडेसाती लागणार असे भाकीत भाजपच्या अनेक नेत्यांनी केले. चव्हाणांनी हा चुनावी जुमला आहे म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, त्यांच्या मनातील अव्यक्त भिती ते लपवू शकले नाहीत. अशोक चव्हाणांनी अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तर भाजपने राज्यातील प्रचार यंत्रणेची ताकत लावून पंढरपूरची पुनरावृत्ती करु असे म्हटले आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याने कोणाचे पारडे जड ठरणार हे मात्र 2 नोव्हेंबर च्या निवडणुक निकाला नंतरच कळेल.

See also  महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या दृष्टीने उचलली पावले.