मुंबई :
भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. रोहित शर्माला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुढील वर्षी T20 विश्वचषक आणि 2023 मध्ये होणार्या एकदिवसीय विश्वचषक खेळेल. यासोबतच रोहितकडे कसोटी संघाचे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. BCCI ने बुधवार, 8 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली आणि त्यासोबतच, वरिष्ठ निवड समितीने कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवण्याच्या निर्णयालाही मान्यता दिली.
नवा कोच, नवा कॅप्टन
टीम इंडियाचा अलिकडेच कोचही बदलला आहे. रवी शास्त्री पायउतार होऊन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड (द वॉल) ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघाचा नवा कर्णधारही जाहीर करण्यात आला आहे.
रोहितची सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी
रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे. रोहितला सध्याच्या घडीचा सर्वात बेस्ट आणि स्फोटक ओपनर मानले जाते, त्याच्या नावावर अनेक उतुंग रेकॉर्ड आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. तर एका विश्वकप स्पेर्धेत 5 शतके ठोकणाराही तो जगात एकमेव खेळाडू आहे. अलिकडेच त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरीही सुधारली आहे.
ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार
विराट कोहलीच्या नावावर अनेक चांगले विक्रम आहेत. मात्र आयसीसी इव्हेंटमध्ये त्याची कामगिरी म्हणावी अशी झाली नाही. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात जिथे टीम गेली तिथे ट्रॉफी जिंकून आली आहे. शिवाय रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली आहे.