नवी दिल्लीः
देशातील अति विशेष व्यक्तींच्या सुरक्षेला बळकटी देणाऱ्या Z+ सुरक्षा कवचात आता महिला कमांडोचाही समावेश असेल. सीआरपीएफने विशेष प्रशिक्षण देत 32 महिला कमांडोंची तुकडी तयार केली असून ही टीम लवकरच तैनात केली जाईल.
त्यामुळे आता अमित शहा, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या VIP नेत्यांच्या पाठीशी महिला कमांडो उभ्या असलेल्या आपल्याला दिसू शकतील.
10 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 महिला कमांडोंना व्हीआयपी सुरक्षा, ड्यूटी, निःशस्त्र युद्ध, विशेष शस्त्रांद्वारे फायरींग आदी गोष्टींचे 10 आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यापासून महिला कमांडोंना तैनात केले जाईल. सुरुवातीला दिल्लीतील ज्या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा कवच आहे, त्यांच्यासोबत या कमांडोंना तैनात केले जाईल. या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वढेरा, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास आणखी डझनभर लोकांना क्रमा-क्रमाने महिला कमांडोंची तुकडी संरक्षण देईल. महिला कमांडोंना या व्हीआयपी व्यक्तींच्या गृह सुरक्षा टीमचे सदस्य म्हणून तैनात केले जातील. तसेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांदरम्यान आवश्यकता असल्यास नेत्यांसोबत या कमांडोंना दौऱ्यावरही पाठवले जाईल.
Z+ सुरक्षा कोणाला असते?
सध्या देशात फक्त पाच व्यक्तींना व्हीआयपी झेड प्लस सुरक्षा दिली जाते. सीआरपीएफच्या वतीने हे सुरक्षा कवच प्रदान केले जाते. यात पाच व्यक्तींमध्ये गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (पत्नी गुरुशरण कौरसह), काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. सुरक्षा विषयावरील ब्लू बुकनुसार, झेट प्लस कॅटेगरीतील सुरक्षेत 10 आर्म्ड स्टॅटिक गार्ड, 6 PSO, 24 सैनिक, 2 एक्सकॉर्ट, 5 वॉचर्स दोन शिफ्ट मध्ये असे तैनात असतात. तसेच इनचार्ज म्हणून इन्स्पेक्टर तैनात असतात.