भारत आणि दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये

0
slider_4552

जोहान्सबर्ग :

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 118/2 असा झाला आहे.

कर्णधार डीन एल्गार 46 रनवर तर रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रनवर खेळत आहेत. जोहान्सबर्गच्या कठीण खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेला अजूनही विजयासाठी 122 रनची गरज आहे. भारताने 240 रनचं आव्हान दिल्यानंतर एल्गार आणि एडन मार्करम यांनी दक्षिण आफ्रिकेला आक्रमक सुरूवात करून दिली. या दोघांमध्ये 10 ओव्हरमध्ये 47 रनची पार्टनरशीप झाली, पण शार्दुल ठाकूरने मार्करमच्या रुपात पहिला धक्का दिला.

एडन मार्करमची विकेट गेल्यानंतर जोहान्सबर्गच्या खेळपट्टीने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. भारतीय फास्ट बॉलिंगच्या आक्रमणासमोर डीन एल्गारने झुंज दिली. यातले अनेक बॉल एल्गारच्या शरिराला लागले. यानंतर अश्विनने कीगन पीटरसनला एलबीडब्ल्यू केलं.

तिसऱ्या दिवसाची सुरूवात 85/2 करणाऱ्या भारताचा 266 रनवर ऑल आऊट झाला. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 रनचं आव्हान मिळालं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकं केली, तर हनुमा विहारीने तळाच्या खेळाडूंना घेऊन नाबाद 40 रनची झुंजार खेळी केली. पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट घेणाऱ्या शार्दुल ठाकूरने 24 बॉलमध्ये 28 रन केले, यामध्ये 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जेनसनला प्रत्येकी 3-3 विकेट तर डुआन ओलिव्हरला एक विकेट घेण्यात यश आलं. भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता या टेस्टमध्ये विजय मिळवून पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकत इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाला आहे.

See also  प्रथम मानांकित नोवाक जोकोविच व लाल मातीच्या बादशहा राफेल नदाल यांच्यात रंगणार उपांत्य फेरीचा सामना