पुणे :
अभय योजनेंतर्गत रहिवासी आणि व्यावसायिक यांना यामध्ये सवलत मिळणार होती. अभय योजना 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीसाठी राबवण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीच अंमलबजावणी न करता प्रशासनाने कमर्शियल मिळकतीवर कारवाई सुरु केली. दरम्यान, नगरसेवक आणि नागरिकांची मागणी पाहता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभय योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी ‘अभय योजना’
महापालिकेची मिळकत कराची वसुली आणि पालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने एक कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी ही योजना राबवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. अभय योजने अंतर्गत रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. मात्र, प्रशासनाने यावर अंमलबजावणी करण्याचे सोडून आयुक्तांच्या आदेशानुसार कमर्शियल मिळकतीवर कारवाई सुरु केली होती. यातून महापालिकेला 55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परंतु शहरातील नागरिक अभय योजना लागू करण्याची वाट पाहत होते. मिळकत कर विभागाने देखील तसा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. मात्र त्यावर आयुक्तांनी सही केली नव्हती.
आयुक्तांची अभय योजनेला मान्यता, पण…
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी सायंकाळी मिळकत कर विभागासोबत एक आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचा कालावधी आता 26 जानेवारी पर्यंत असणार आहे. याच दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेने यावर्षी देखील मिळकत करातून उत्पन्न मिळवण्याचा विक्रम केला आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळकत करातून मिळाले आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, अभय योजना लागू करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.