पुणे मेट्रोचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच सुरू होणार !

0
slider_4552

पुणे :

वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोची ताशी ९० किलोमीटर वेगाने चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात महामेट्रोला यश आले आहे.

कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून आता परवानगी मिळाल्यावर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात शहरातील मेट्रो ताशी ४० किलोमीटर वेगाने धावणार आहे.

शहरातील वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील म्हणजे वनाज- गरवारे महाविद्यालय मार्गाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. या मार्गावरील वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांचीही कामे पूर्णत्त्वास आली आहेत.

मेट्रोने कमाल ९० किलोमीटर ताशी वेगाने चाचणी घेतली आहे. त्यासाठी पाहणी करण्यास रेल्वेच्या लखनौ येथील रिसर्च ॲंड डिझाईन ऑर्गनायझेशनचे पथकही पुण्यात आले आहे. ताशी ९० किलोमीटर वेगाची चाचणी सलग पाच-सहा दिवस घेण्यात येत आहे. आता हा मार्ग कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टीच्या तपासणीसाठी सज्ज झाला आहे.

त्यांचे पथक १०-११ जानेवारीच्या सुमारास पाहणीसाठी पुण्यात येईल. त्यांच्याकडून एक दिवसांत तपासणी होईल, त्यानंतर उदघाटन झाल्यावर मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी स्पष्ट केले. ताशी ९० किलोमीटर वेगाने मेट्रोची धावण्याची क्षमता असली तरी, पहिल्या वर्षी मेट्रो शहरात ताशी ४० किलोमीटर वेगाने धावेल. आवश्यकतेनुसार हा वेग कमी-जास्त होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी – फुगेवाडी मार्गावरही पहिल्या टप्प्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने धावणार आहे.

See also  आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'Sustainable mobility aword' पुणे महापालिकेस प्राप्त झाला.