पुणे :
पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब(Building Slab) कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबच्या जाळ्यांमध्ये अडकून पाच कामगारां(Workers)चा जागीच मृत्यू झाला, तर 10 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती आहे.







त्यांना ढिगाऱ्याखालून काढून प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. ही घटना रात्री उशिरा येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. या दुर्घटनेत तळमजल्यावरील कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
स्लॅब टाकायचे काम सुरु असताना घडली दुर्घटना
गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वाडीया बंगल्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. स्लॅबच्या जाळ्यामध्ये अडकलेल्यांपैकी काही जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवले जात आहे. इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब टाकायचे काम सुरु होते. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने चार गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. तातडीच्या बचावकार्यामुळे काहींच्या जीविताचा धोका टळला. या बचावकार्यामध्ये स्थानिक रहिवाशांनीही पुढे येऊन मदत केली. अनेकांनी अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याआधी मदतीसाठी तातडीचे प्रयत्न सुरु केले होते. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दुर्घटनेबाबत ट्विट करून घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केले.
कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्य
महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला. यात गंभीर अवस्थेतील काही जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. यावेळी जवानांनी एका मागोमाग एक सात कामगारांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दुर्घटनेला जबाबदार लोकांवर गुन्हे दाखल करणार
या दुर्घटनेने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दुर्घटना घडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.







