इंग्लंड :
क्रिकेटविश्वाच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. कारण, या वर्षात तब्बल तीन विश्वचषक खेळले जाणार आहेत. त्यापैकी वर्षाच्या सुरुवातीला एकोणीस वर्षाखालील मुलांचा विश्वचषक भारताच्या युवा संघाने इंग्लंडला पराभूत करत त्या विश्वचषक आपल्या नावे केला. त्यानंतर पुरुषांचा टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे खेळला जाईल. तसेच, महिला क्रिकेटची सर्वात मानाची स्पर्धा असलेला वनडे विश्वचषक न्यूझीलंड येथे सुरू होईल. हा विश्वचषक सुरु होण्यासाठी २० दिवसांचा अवधी शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ केली आहे.
बक्षीस रकमेत झाली वाढ
न्यूझीलंड येथे ४ मार्चपासून महिला विश्वचषक खेळला जाईल. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेत मागील विश्वचषकापेक्षा ७५ टक्के वाढ केली आहे. तसेच विजेत्या संघाला मागील विश्वचषकापेक्षा दुप्पट रक्कम मिळेल. ही रक्कम तब्बल १३ लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स इतकी असेल. जी २०१७ मध्ये इंग्लंड संघाने जिंकलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. त्याचबरोबर उपविजेत्या संघास ६ लाख अमेरिकन डॉलर्स दिले जातील. एकूण ३५ लाख डॉलर्स इतकी रक्कम सहभागी आठ संघांमध्ये वाटण्यात येईल.
उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी ३ लाख अमेरिकन डॉलर्स देण्यात येतील. तर साखळी फेरीत बाद झालेल्या चार संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर्स मिळतील. यापूर्वीही रक्कम ३० हजार डॉलर्स इतकी होती.
या स्पर्धेमध्ये भारतीय संघ अनुभवी मिताली राज हिच्या नेतृत्वात उतरला आहे. तिच्यासह भारतीय संघाचा सलामीवीर शेफाली वर्मा, स्मृती मंधना व उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. वेगवान गोलंदाजीची धुरा झुलन गोस्वामी वाहेल. फिरकी गोलंदाज म्हणून पूनम यादव संघाचा भाग आहे. भारतीय संघाने २०१७ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत भारतीय संघाला यजमान इंग्लंडने अटीतटीच्या सामन्यात पराभूत केलेले.