मुंबई :
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) मान्यता दिली आहे.
हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरु करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुरु होत असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. वानखेडे स्टेडियम येथे माध्यमांशी संवाद साधाताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, भारताचे माजी डावखरे फिरकी पटू निलेश कुलकर्णी, क्रीडा विभागाच्या उपसचिव श्रीमती नानल यांची उपस्थिती होती.
श्री. केदार म्हणाले, राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ करण्याचा मानस आहे. क्रीडा विद्यापीठातील सुरु होणारा अभ्यासक्रम राज्यासाठी नवीन आहे. यामध्ये उणीवा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. माध्यमांनी आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी सूचना केल्यास त्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशात विविध भागात 700 पेक्षा जास्त महाविद्यालयात क्रीडा अभ्यासक्रमाचे कोर्सेस सुरु आहेत. त्यांनाही त्या कोर्सेससाठी विद्यापीठामुळे मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गेल्या दीड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा झाली त्याच वेळी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार होता, परंतु पूर्ण जगावरच कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होता. आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने अभ्यासक्रम सुरु करता आला नाही. आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्यांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने केले आहे. क्रीडा शिक्षणाचे नामकरण करण्याची गरज लक्षात घेऊन समकालीन व भविष्याभिमुख अध्यापनशास्त्रात बदल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित “स्पोर्ट्स-एड” क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल असेही श्री. केदार यांनी सांगितले.