पुणे :
पुणे महानगरपालिकेवर (PMC) प्रशासक नेमला जाणार आहे. महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आचार संहिता लागणे शक्य नसल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
१५ मार्च पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.
कोरोना (Corona) महामारी आणि ओबीसी (OBC Reservation) समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याने राज्यात महापालिकांच्या निडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी- मार्च महिन्यात होऊन १३ मार्च पूर्वी नवी महापालिका अस्तित्वात येणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही ही निवडणूक (Election) आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १४ मार्च नंतर पुणे महापालिकेवर प्रशासक येणार हे निश्चित झाले आहे.
त्यामुळे तत्काळ प्रशासक नेमण्यात यावा असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. ही जबाबदारी १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत. याबाबत विक्रम कुमार यांनीही दुजोरा दिला असून, १५ मार्च पासून प्रशासक म्हणून काम करण्याचे आदेश मिळाले आहेत, असे कुमार यांनी सांगितले.