पुणे :
जम्बो रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिवाजीनगरच्या जम्बो रुग्णालयातील रुग्ण नायडू, बाणेर आणि ससून रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करून, याशिवाय पिंपरीतील जम्बो रुग्णालयातील रुग्णांना ‘वायसीएम’ रुग्णालयात नेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. सध्याच्या परिस्थितीत घटलेली रुग्णसंख्या, जम्बो रुग्णालयात झालेल्या हाणामाऱ्या, या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून झालेली आंदोलने या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली
जम्बोमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन का झाले, तसेच तेथे झालेली हाणामारी हा काय प्रकार होता, येथील कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न मिळाल्याने त्यांनी महापौर मोहोळ यांनाही घेराव घातला होता, तर वेतनाचा प्रश्न उपस्थित का झाला होता, याबाबत पवार यांनी विचारणा केली होती. ‘जम्बो’मधील समस्यांवर चर्चा करताना येथे झालेल्या हाणामारीची वस्तुस्थितीही पवार यांच्यापुढे कथन करण्यात आली.
यावर उपस्थितांनी जम्बोसाठी निधीची कमतरता असल्याचे स्पष्टीकरण दिले. राज्य सरकारकडून जम्बो रुग्णालयासाठी ११० कोटी रुपये येणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यंत केवळ ५० कोटी रुपये आले असल्याचे उपस्थित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. शिवाजीनगरच्या जम्बो रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना नायडू, बाणेर आणि ससून रुग्णालयात दाखल करावे; तसेच पिंपरी येथील जम्बो रुग्णालयातील रुग्णांना ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची आणि विषाणूची भीती कायम असल्याने या रुग्णालयांतील पायाभूत सुविधा या तशाच ठेवाव्यात. मात्र, येथील व्यवस्थापन आणि उपचार सध्या बंद करावेत. दुर्देवाने गरज भासली, तर परत ही रुग्णालये सुरू करता येतील, याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.