पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार

0
slider_4552

पुणे :

पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. नवीन टर्मिनलचे सध्याच्या टर्मिनलसह एकत्रिकरण करण्यात येत आहे. याचे क्षेत्रफळ 7 लाख 50 हजार चौरस फूट असेल आणि प्रवासी हाताळणी क्षमता 16 एमपीपीए असेल. त्यामुळे विमानतळाची क्षमता वाढणार आहे.

५५ टक्के काम पूर्ण

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) पुणे विमानतळावर वर्धित क्षमतेसह आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ज्यामुळे विमानतळावरील घाईच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल. एएआयने टर्मिनल इमारतीचे बांधकाम 475 कोटी रुपये खर्चून हाती घेतले आहे. यापैकी 55% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे आणि नवीन इमारतीचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

७० लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता

22,300 चौ.मी.चे बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेल्या विद्यमान टर्मिनल इमारतीत वार्षिक सत्तर लाखापर्यंत (एमपीपीए) प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. एएआयने 5,00,000 चौरस फुटापेक्षा जास्त बिल्ट अप क्षेत्र असलेल्या अत्याधुनिक नवीन टर्मिनलचे बांधकाम हाती घेतले आहे. विद्यमान टर्मिनलसह एकत्रित केलेल्या नवीन टर्मिनलचे एकात्मिक क्षेत्र 7,50,000 चौ.फूट असेल. त्याची प्रवासी हाताळणी क्षमता 16 एमपीपीए असेल.

शहराच्या बाजूने लक्षवेधी नजारा

नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत (जुन्या इमारतीसह) 10 पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, 72 चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी यंत्रणेच्या तरतुदीसह मध्यवर्ती वातानुकूलित असेल. ही इमारत चार तारांकित (फोर-स्टार) जीआरआयएचए मानांकनासह ऊर्जा कार्यक्षम इमारत असेल. खानपान (एफ अँड बी) आणि रिटेल आऊटलेट्ससाठी 36000 चौरस फूट जागेची तरतूद प्रवाशांच्या अल्पोपहारासाठी/सुखसोयींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्याची इमारत आणि नवीन इमारतीच्या शहराच्या बाजूने असलेल्या भव्य छतामुळे विमानतळाला शहराच्या बाजूने एक भव्य लक्षवेधी नजारा मिळेल.

शनिवार वाडा उद्यानापासून प्रेरणा

नवीन टर्मिनल इमारतीसाठी प्रकल्पाचा सर्वात प्रमुख उद्देश म्हणजे जुने आणि नवीन यात एकता आणि सातत्य शोधणे आहे. 360 मीटर पेक्षा जास्त लांबीचा, व्हरांडा हा एकसंध दर्शनी भाग आहे. जो केवळ ऊन आणि पावसापासून संरक्षण प्रदान करत नाही तर पुणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सामाजिक, ऐतिहासिक, कलात्मक संस्कृतीची कथा सांगणारे एक भव्य शहरी भित्तिचित्र देखील आहे. मोठ्या व्हरांड्याच्या खाली असलेल्या सार्वजनिक क्षेत्राच्या दर्शनी भागाला सुंदर मराठा कमानी आणि स्थानिक गडद दगडांसह सजवलेल्या स्तंभांचा आधार आहे. सामान्यतः महाराष्ट्राच्या आसपासच्या बहुतेक ऐतिहासिक वारसा वास्तूंमध्ये तो दिसून येतो. नवीन प्रांगणातील उद्यानाची संरचना थेट पुण्यातील सर्वात प्रसिद्घ ठिकाणांपैकी एक असलेल्या शनिवार वाडा उद्यानापासून प्रेरित आहे.

See also  उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

बहुमजली वाहनतळ

वाहनतळाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, 120 कोटी रुपये खर्चासह बहुमजली वाहनतळाचे (तळमजला अधिक तीन मजली आणि दोन तळघर) देखील बांधकाम सुरु आहे. जुलै 2022 पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. बहुमजली वाहनतळात 1024 गाड्यांची क्षमता असेल आणि जीना, सरकते जीने आणि उदवाहक तरतुदीसह खाली/वर जाण्यासाठी इमारतीच्या बाजूला विद्यमान इमारतीच्या निर्गमन क्षेत्राशी ते जोडले जाईल.

पायाभूत सुविधांना गती

पंतप्रधानांनी नुकतेच पुणे शहरासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामुळे पुणे शहराने शिक्षण, संशोधन आणि, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. पुणे विमानतळाची नूतनीकृत टर्मिनल इमारत ही त्यात भर घालणार आहे. त्यांच्या पायाभूत सुविधांबाबच्या ध्येयदृष्टीत पीएम-गती शक्ती राष्ट्रीय बृहद् योजने अंतर्गत गती मिळाली आहे.