पुणे :
पुण्यात बारावीच्या परीक्षा केंद्रावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारावी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील केंद्रच महाविद्यालयाने परस्पर बदलले आहे. एका खाजगी क्लासमध्ये हे पेपर होत असल्याचे समोर आले आहे. अधिकारी मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्यातील टिळक रस्त्यावर एका इमारतीमध्ये राव ज्युनिअर कॉलेज आहे. तिथे बारावीचे परीक्षा केंद्र आहे, अशी अधिकृत माहिती बोर्डच्या संकेतस्थळावर देखील आहे. मात्र, प्रत्यक्षात जाऊन बघितले असता तिथे परीक्षा केंद्रच नसल्याची बाब मनसेच्या विद्यार्थी सेनेने निदर्शनास आणली. तसेच, ही बारावीची परीक्षा पुलगेट येथील एका खासगी क्लासमध्ये घेतली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शिक्षण मंडळाला माहितीच नाही
विशेष म्हणजे बोर्डाने नेमून दिलेल्या केंद्राला टाळे ठोकत एका खाजगी क्लासेस मध्ये बारावीच्या परीक्षा घेतली जाते. त्याबद्दल राज्य शिक्षण मंडळाला कोणतीही माहिती नसल्याचे समोर येत आहे. या सर्व प्रकारानंतर शिक्षण मंडळाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर येत आहे.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थी होते
राव ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर 51 विद्यार्थी परीक्षा देणार होते. त्यासाठी योग्य ती कुमक देखील बोर्डाने परीक्षा केंद्रावर पाठवली होती. मात्र, बोर्डाच्या डोळ्यात धूळ फेकत, केंद्र बदलण्याचा हा प्रकार घडला आहे. याबाबत तथाकथित परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकाने अक्षराक्ष: उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
तर, विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच, पेपर दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जात पडताळणी करणार आहेत.