नवी दिल्ली :
कोरोना संकट नियंत्रणात असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँका आणि मार्केट ट्रेडिंगच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार १८ एप्रिल २०२२ पासून देशातील सर्व बँका आणि मार्केट ट्रेडिंग सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होईल.
व्यवहार नऊ वाजता सुरु
देशातील बँकांचा व्यवहार करण्याची वेळ आता बदलण्यात येत असून सोमवारपासून एक तास आधीच आता उघडणार आहेत. या निर्णयामुळे 18 एप्रिलपासून ही वेळ लागू होणार आहे. सोमवारपासून बँका आता नऊ वाजता सुरु होणार आहेत, तर बँक व्यवहार बंद होण्याची वेळ मात्र जुनीच ठेवण्यात आली आहे. बँक आता एक तास आधीच उघडणार असून याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँक ग्राहकांना समाधान मिळणार आहे, कारण आता एक तास जादाचा वेळ यामुळे मिळणार आहे. याआधी बँका या दहा वाजता सुरु होत होत्या, मात्र आता सोमवारपासून 9 वाजता बँकांचे व्यवहार सुरु होणार आहेत.
नोकरदार वर्गाना समाधान
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समाधान मिळाले आहे. अनेक नोकरदार वर्गाना शनिवार किंवा रविवारी सुट्टी असते, मात्र यादिवशी ते बँकेतील कामं करु शकत नाहीत, कारण बँकांचेही शनिवारी अर्धा दिवसच व्यवहार चालू असतात. आरबीआयच्या या निर्णयामुळे ऑफिसला जाणारे जे कर्मचारी आहेत, ते बँकेतील काम करुन आपापल्या ऑफिसला जाऊ शकतात. कोरोना महामारी येण्याआधीही बँकांच्या वेळ ही 9 वाजताच होती. मात्र कोरोनाचे संकट वाढल्यानंतर या वेळेत बदल करण्यात आला आहे, त्या वेळेत बदल करुन 10 वाजता बँक सुरु करण्याचा निर्णय केला गेला होता. मात्र सध्या कोरोना महामारीतून देश बाहेर आल्याने बँकांचे व्यवहार सुरु होण्याची वेळ पहिल्यासारखीच करण्यात आली आहे.
यूपीआयद्वारे पैसे काढू शकणार
या निर्णयाबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यूपीआयद्वारे पैसे काढण्याचा (cash withdrawal) परवानगीही देण्यात आली आहे. बँकेकडून देण्यात येणारी ही सुविधा पूर्णपणे कार्डलेस असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करण्याचीही गरज नाही. एटीएम आणि डेबिट कार्डमुळे होणाऱ्या घोटाळ्यामुळे कार्डलेस ट्रांजक्शनचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही यूपीआयचा वापर करुन एटीएममधून पैसे काढू शकणार आहात.