केंद्र सरकार नवीन कामगार कायदे लागू करण्याची लवकरच शक्यता…

0
slider_4552

नवी दिल्ली :

वेतन, त्याची रचना, कामाचे तास, आठवड्याच्या सुट्ट्या यासारख्या बाबी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात.

मात्र आता यात बदल होणार आहेत. कारण केंद्र सरकार नवीन कामगार कायदे लागू करणार आहे. यामुळे तुमच्या वेतनावर, कामाचे तास आणि सुट्ट्या, पीएफ (PF) यासारख्या बाबींवर मोठा परिणाम होणार आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनूसार केंद्र सरकार यावर्षी 1 जुलैपासून नवीन कामगार कायदे लागू करण्याचा विचार करते आहे. या संदर्भात, केंद्र चार नवीन लेबर कोड तयार करण्यावर काम करत आहे. ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे पगार, पीएफ योगदान आणि कामाच्या तासांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जातील.

सरकार लवकरात लवकर लागू करण्यासाठी प्रयत्नशील

प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार पीएम मोदी नवीन कामगार कायदे म्हणजे श्रमसंहिता लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नवीन कामगार कायदे अंमलात येण्यासाठी किमान तीन महिने लागतील कारण सर्व राज्यांनी अद्याप मसुदे तयार केलेले नाहीत. वृत्तसंस्थेशी बोलताना, एका सरकारी अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितले होते की चार कामगार संहिता 2022-23 या आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या संख्येने राज्यांनी यावरील मसुदा नियमांना अंतिम रूप दिले आहे. त्यांनी असेही सांगितले होते की केंद्राने फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितांवरील मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की कामगार कायदा हा समवर्ती विषय असल्याने केंद्र सरकार आणि राज्यांनीही त्याची एकाच वेळी अंमलबजावणी करावी असे वाटते.

नवीन कामगार कायद्यांबाबत तुम्ही जाणून घ्यावे असे

विशेष म्हणजे, नवीन कामगार कायद्यांतर्गत चार कामगार संहिता नियमांमुळे देशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि परिणामी रोजगाराच्या संधी वाढतील. आत्तापर्यंत 13 राज्यांनी कामगार संहिता नियमांचे मसुदे तयार केले आहेत. या राज्यांमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, पंजाब, मणिपूर, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर राज्यांचा समावेश आहे.

See also  देशभरात एक सामाईक पीयूसी प्रमाणपत्र असणार : केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्रालय

उल्लेखनीय म्हणजे, कामगार संहितेच्या नियमांमध्ये 4 श्रम संहिता ज्यात वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसाय सुरक्षा आणि आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती समाविष्ट आहेत. हे नियम संसदेने पास करण्यात आले आहेत.

नवीन कामगार कायदे लागू झाल्यास होणारे महत्त्वाचे बदल-

१. कामाचे तास: केंद्र सरकारने 1 जुलैपासून नवीन कामगार कायदे लागू केल्यास कार्यालयीन कामकाजाचे तास 8 ते 9 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढू शकतात. केंद्र सरकार शक्य तितक्या लवकर नवीन नियम लागू करण्याची योजना आखत आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कंपन्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पाच ऐवजी चार दिवस काम करायला लावू शकतील आणि तीन दिवस सुट्ट्या असतील.

२. टेक-होम पगार आणि पीएफ योगदान: नवीन कामगार कायद्यानुसार, मूळ वेतन हे एकूण पगाराच्या 50% किंवा त्याहून अधिक असेल. अर्थात याचा परिणाम बहुतेक कर्मचार्‍यांच्या पगार रचनेवर होईल. मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीचे पैसे पूर्वीपेक्षा जास्त कापले जातील. पीएफ योगदानामध्ये वाढ होणार असल्याने हाती येणाऱ्या पगाराची रक्कम कमी होईल.

३. ग्रॅच्युइटी आणि पीएफचे योगदान जसजसे वाढेल, तसतसे निवृत्तीनंतर मिळणारे पैसेही वाढतील. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी याचा फायदा होईल.