पुणे :
इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या दरातील वाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आक्रमक आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वेळीच रोखत त्यांना हॉटेल परिसरातून बाहेर काढलं. यावेळी केंद्र सरकार आणि स्मृती इराणी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हाय हाय मंहगाई मोदीजीने लाई, जबसे भाजपा सत्ता में आयी, कमरतोड महंगाई लायी. क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
बालगंधर्व याठिकाणी एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्मृती इराणी आल्या. त्यावेळी कार्यक्रम चालू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहातच मोठा राडा घातला. यावेळी पुणे शहर महिला काॅंग्रेसने देशातील वाढत्या महागाईवरून जोरदार आंदोलन केलं. यावेळी त्यांनी स्मृती इऱाणी यांना चुल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमाच्या स्थळी आणल्या होत्या. मात्र पोलिसांनी पुणे शहर महिला अध्यक्षा पुजा आनंद यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
बालगंधर्व याठिकाणी झालेल्या राड्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपकडून मारहाण झाल्याचा देखील आरोप होत आहे. यावर बोलताना स्मृती ईऱाणी म्हणाल्या की, काॅंग्रेस अध्यक्ष हटवल्यानंतर त्यांचा राग माझ्यावर काढला जात आहे. तसचे कोणतंही आंदोलन अहिंसक पद्धतीने व्हावं अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.