जकार्ता :
भारताला सुपर ४ मधील दुसऱ्या लढतीत मलेशियाने ३-३ असे जरुर बरोबरीत रोखले असले, तरी भारतीय संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर आहे.
मलेशियाकडून रहिमने १२, २१, ५६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना मलेशियाचे आव्हान राखले होते. पण, दोन गोलच्या पिछाडीनंतरही भारतीयांनी कमालीचा खेळ करून सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली हगोती. विष्णुकांत सिंग याने ३२व्या मिनिटाला भारताचा पहिला गोल केला. त्यानंतर दोन मिनिटांत दोन गोल करून भारताने आघाडी घेतली. प्राथम एसव्ही सुनील याने ५३व्या, तर ५५व्या मिनिटासला निलम झेस याने गोल केले. मात्र. पुढच्याच ५६व्या मिनिटाला भारताला गोल स्विकारावा लागला.
दरम्यान, सुपर फोर मधील दुसऱ्या सामन्या दक्षिण कोरियाने जपानचा ३-१ असा पराभव केला. त्यामुळे भारताच्या अंतिम फेरीच्या आशा भक्कम झाल्या. मलेशियाला दुसऱ्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. पहिल्या सामन्यात त्यांचा कोरियाविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता.
यानंतर सुपर फोरमधील चित्र बघितल्यास कोरिया गोल सरासरीच्या+2(5-3)आधारे आघाडीवर आहे. भारत +1(5-4) दुसऱ्या स्थानावर आहे. जपानने दोन्ही सामने हरले आहेत. ते स्पर्धेबाहेर गेले आहेत. मलेशियाची गोल सरासरी शून्य आहे. त्यांना अखेरच्या सामन्यात जपानला किमान दोन गोलच्या फरकाने हरवावे लागेल आणि त्याचवेळी कोरिया-भारत सामना बरोबरीत सुटावा लागेल, तरच त्यांचे आव्हान कायम राहिल.
मलेशियाच्या वेगवान खेळापुढे आज भारताच्या बचावाची निश्चित कसोटी लागली. गोलरक्षक सुरज करकेरा याला सहाव्या मिनिटापासून सतर्क रहावे लागले. त्याच्या भक्कम बचावामिुळे भारतावर अधिक गोल चढू शकले नाहीत. पूर्वार्धातील दुसऱ्या सत्रात भारतीयांनी गोल करण्याच्या संधी मिळविल्या, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यातही कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आल्याचे शल्य त्यांना नक्कीच जाणवत असेल.