प्रभाग निहाय मतदारयाद्या अंतिम करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश… महापालिका निवडणुकीच्या कामांना गती!

0
slider_4552

पुणे :

महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय मतदारयाद्या अंतिम करण्याचे आदेश आज राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार १७ जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करून २५ जूनपर्यंत त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार असून ७ जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

राज्यातील १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अनुसुचित जाती, जमाती व महिला आरक्षणाची सोडत झाली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज सर्व महापालिकांना प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीच्या आधारे मतदार याद्या करण्यासात येणार आहेत. प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांनंतर १३ मे रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. प्रभाग रचना अंतिम करताना प्रभागांमध्ये बदल झाले असून मतदार संख्येतही बदल झाले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्याने आता मतदार याद्याही अंतिम करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

यानुसार १७ जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. १७ ते २५ जून दरम्यान या याद्यांवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लेखनिकांच्या काही चुका, दुसर्‍या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले असतील, संबधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही संबधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे याच दुरूस्त्या केल्या जाणार आहेत.

या दुरूस्त्यांनंतर अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या ७ जुलै रोजी प्रसिद्ध कराव्यात, असे आदेशही महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

See also  पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा घेतला निर्णय