पाषाण :
गेले दहा वर्षांपासून पुणे मनपाला या फुटलेल्या ड्रेनेज संबंधी व नदीत मिसळत असलेल्या घाण पाण्यासंबंधी तक्रार नोंदवली की, फक्त तक्रार बंद करण्याचे काम करतात. हे लॉंगटर्म काम आहे. हा शेरा लिहून सरळ तक्रार बंद करतात. पण लॉंगटर्म म्हणजे किती ? २ वर्षे , ५, १० , २० की ५० वर्षे हे मात्र सांगत नाही, अशी प्रतिक्रिया पाषाण येथील नागरिक दीपक श्रोते यांनी मॅक न्यूज शी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे केंद्रासरकार “नमामी गंगे” राज्य सरकार “नमामी चंद्रभागे” या नावानी नद्या स्वच्छ व बरमाही वाहत्या राहाव्यात म्हणून महत्वकांक्षी योजना राबवण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात स्मार्ट सीटी च्या पाषाण, बाणेर या प्रभागात आपण साधे नदी कडेतून जाणारे ड्रेनेज दुरुस्त करू शकत नाही. ही पुण्याकरिता व पुण्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासनाकरिता लाजिरवाणी गोष्ट आहे.
दुसरीकडे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट (RFD) म्हणून लाखो, करोडो रुपयांच्या प्रोजेक्ट्स ची चर्चा पुणे मनपा करते. हे म्हणजे पुण्यातील नद्या आय सी यु त असताना त्यांना ब्युटीपार्लर मध्ये नेणे असला प्रकार दिसतो. नदीला येऊन मिळणारे झरे, ओढे हे अतिक्रमणाच्या विळख्याने संपवले जात आहे. नदीत घाण, कचरा, राडा रोडा सर्रास येउन पडतो त्यामुळे नदीतून दुर्गंधी येते व नद्या मरणासन्न झाल्या आहेत. नदी मरत असताना त्याकडे दुर्लक्ष करून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट च्या गोष्टी करणे यातून नक्की काय साधायचे आहे?
रामनदी स्वच्छता मोहीम अंतर्गत नागरिक गेले बारा वर्षे कार्यरत आहे. तेव्हा स्थानिक शासन म्हणून पुणे महानगरपालिकेने सुध्दा आपली जबाबदारी पार पाडावी.
नागरिकांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.
१. रिव्हर व सिव्हर वेगवेगळे असावेत. पहिल्या टप्प्यात ड्रेनेजलाईन चे फुटलेले चेंबर व पाईपलाईन संपूर्ण रामनदीपरीसरातील ताबडतोब दुरुस्त करावी, नंतरच्या टप्प्यात ती नदी परिसरातून बाहेर काढावी.
२. नदीला नदीची जमीन परत द्या. नदीपात्र व पुररेषा तसेच नदीला येऊन मिळणारे छोटे, मोठे ओढे, नाले व झरे हे संरक्षित करून अतिक्रमण मुक्त करून नदीला मोकळा श्वास घेऊ द्या. तरच नदी वाचू शकेल.
अधिकाऱ्यांनी आश्वासने ही बंद करावी व शहरासमोरच नव्हे तर महाराष्ट्रात व देशात नदी पुनर्जीवन संबंधी एक आदर्श पुण्याने उभा करावा. नागरिक म्हणून आम्ही सोबत आहोतच पण नदी साठी, जलस्रोतासाठी खऱ्या अर्थाने काम होणे अपेक्षित आहे, असे मत अनेक पर्यावरण प्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत.