नवी दिल्ली :
डोलो-650 हे औषध बनवणाऱ्या बंगळुरुतील मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाच्या 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने ही छापेमारी केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
कर चोरी प्रकरणी ही छापेमारी केली जात असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी बेंगळुरूमधील रेसकोर्स रोडवर असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. याशिवाय आयकर विभागाने नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कंपनीच्या 40 ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत 200 हून अधिक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. कंपनीचे सीएमडी दिलीप सुराणा आणि संचालक आनंद सुराणा यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.
आयकर विभागाच्या या कारवाईत रेसकोर्स रोडवर असलेल्या मायक्रो लॅबच्या कार्यालयातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने करचुकवेगिरीशी संबंधित छाप्यांची ही कारवाई केली आहे.