पुणे :
नुपूर शर्माच्या बाबतीत तात्काळ कारवाई करण्यात आली तशीच कारवाई राज्यपालांंवर करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
राज्यपालांविरोधात पुण्यात (Pune Bandh) बंदची हाक दिली होती. त्यात उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.
शेकडो वर्षानंतर छत्रपची शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर अजूनही बघायला मिळतो. काहीही कारण नसताना शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं करतात. त्यांच्या सन्मान झाला पाहिजे हे सांगण्याची वेळ आली आहे. यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. त्यामुळे राज्यपालांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यपालांविरोधात आज पुण्यात बंदची हाक दिली होती. त्यानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांनी 11 वाजता डेक्कन परिसरातील गरवारे पुलाजवळील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मूकमोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. सुमारे साडे सात हजार पोलीस मूक मोर्चाच्या मार्गावर तैनात करण्यात आले होते.
बंदला प्रतिसाद?
मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद ठेवण्यात आलं होतं. विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद होती. गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे नुमवी शाळा बंद ठेवण्यात आली होती. त्यासोबतच पुण्यातील इतर शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात पीएमपीएमएल बससेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद होते. हॉटेल्स बंद ठेवण्यात आले होते.
कोणाकोणाचा सहभाग?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी झाले होते. त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनी देखील पाठिंबा दिला होता. आज सकाळी साडेतीन वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मूक मोर्चास प्रारंभ झाला. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मूक मोर्चाची सांगता झाली.