पुणे :
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सर्वाधिक लसीकरणात मुंबईने आघाडी घेतली आहे. मात्र, त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण लाभार्थ्यांपैकी ४३ हजार ८४० जणांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याने राज्यात सर्वाधिक लाभार्थ्यांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
राज्यात १६ जानेवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणास प्रारंभ झाला. तेव्हापासून पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणास सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत लसीकरणाच्या सत्रांची संख्या हळूहळू वाढविण्यात आली. ‘को विन’ अॅपमध्ये काही तांत्रिक अडथळे आल्याने त्यामुळे काही ठिकाणी सत्र सुरू होऊ शकली नाहीत. परंतु, तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर त्या ठिकाणी लसीकरण सुरू झाले.
राज्यात शनिवारी दिवसभरात ३७ हजार ८६२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २५ हजार ७०९ आरोग्य कर्मचारी; तर १२ हजार १५३ ‘फ्रंट लाइन’ वर्कर लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’ ही लस ४ हजार ६०१ जणांना देण्यात आली; तर आतापर्यंत एकूण ४ लाख ७२ हजार ८०५ जणांना लसीकरण करण्यात आल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.