तळजाई टेकडी वाचविण्यासाठी “हरित दांडी यात्रेचे” आयोजन

0
slider_4552

पुणे :

तळजाई टेकडीवरचा जैवविविधतेने समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. येथील जागेचे कॉंक्रिटीकरण होउन नैसर्गिक अधिवास संपुस्टात येण्याबरोबरच पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीची ओळख पुसली जाण्याची भिती निर्माण होत आहे. त्यामुळे माय अर्थ फांउडेशनतर्फे आणि पर्यावरणप्रेमी संस्थेंच्या वतीने शनिवार, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून हरित दांडी यात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ७:३० वा. यात्रेची सुरुवात तळजाई माता मंदिर येथून सुरु होऊन सदू स्टेडीयम येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

पर्यावरणप्रेमींनी नुकतेच तळजाई टेकटीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास विरोध असल्याबाबत आणि नदी-नाले यांचा होणारा –हास थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले.

माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले की, तळजाई येथील प्रस्तावित बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार, अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार हे उघड असल्याने या ठिकाणी या प्रकल्पास निसर्गप्रेमी विरोध दर्शवित आहेत. तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे पर्यावणप्रेमींना वाटत असून त्यामुळे गांधी जयंती निमित्ताने हरित दांडी यात्रेचे आयोजन केले आहे. प्राणी, पक्षी, आणि झाडांच्या प्रतिकृतीत प्रबोधनात्मक कार्यक्रम यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे तळजाई माता मंदिर येथे जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी घरत यांनी केले.

See also  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः मैदानात