पुणे :
राज्यासह देशभरात पुणेरी पाट्यांची चांगलीच चर्चा असते. पण, आता पुणे शहरातील सध्या एका वादग्रस्त फलकामुळं तीव्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावरील एका उद्यानाच्या फलकास साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केला आहे.







या फलकावरील साध्वी नावास अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.
साध्वी हे नाव सावित्रीबाई फुलेंच्या नावाआधी लावण्यात आलं असल्याची बाब प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत उघडकीस आणली होती. या साध्वी नावावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी असणाऱ्या भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. पण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण देत संबंधित वादग्रस्त फलक हा 1991 साली काँग्रेसच्या काळातील असल्याचं म्हटलं आहे.
1991 साली काँग्रेसची सत्ता असताना या उद्यानाचा कोनशिला समारंभ विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडला होता. याबाबतची माहिती आता समोर येत आहे. महापौर मोहोळ यांनी सावित्रीबाईंच्या नावाआधीचं साध्वी नाव काढून टाकावं अशी मागणी सरोदे यांंनी केली आहे.
दरम्यान, साध्वी हे नाव आक्षेपार्ह आहे. सावित्रीबाई फुले या रचनात्मक काम करणाऱ्या समाजसुधारिका होत्या. सावित्रीबाईंना साध्वी म्हणणं म्हणजे त्यांना एका धर्मात बांधल्या सारखं आहे. त्यामुळं आपण त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं म्हणू शकतो, असं सरोदे यांनी म्हटलं आहे. तसेच आज काही राजकीय संघटनांनी या फलकावरील साध्वी नावावर रंगरंगोटी करत वादग्रस्त नाव खोडून काढलं आहे.







