पुणे :
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन आठवड्यांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आता पुण्यातून प्रभाग बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. त्यांनी पत्रात म्हंटले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पुणे महापालिकेसाठी तीनचा प्रभाग केला आहे. त्यानुसारच प्रभागांची रचना देखील केलेली आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकार ने पुणे व अन्यत्र 3 सदस्यांचा प्रभाग असावा असा निर्णय केला व त्यानुसार रचना केली. सदर रचना करताना अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सोयीची रचना केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या व अनेक नागरिकांनी कोर्टात देखील धाव घेतली.
आता ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आरक्षणाच्या सोडती काढव्या लागणार आहेत. आज वृत्तपत्रातील बातम्यांनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या जागा घटणार असल्याचे स्पष्ट होते. यात समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ नये याची जबाबदारी शासनाची आहे. तरी विद्यमान 3 सदस्यांची प्रभाग रचना रद्द करून 4 सदस्यांची नवीन प्रभाग रचना करावी व नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार नव्याने ओबीसी, महिला व अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण सोडती काढव्यात अशी आग्रही मागणी करत आहे आपण ह्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा व न्यायसंस्थेच्या अधीन राहून निर्णय घ्यावा अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.