हैदराबाद :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात 187 धावांचा 6 गडी राखून यशस्वी पाठलाग करत ही मालिका आपल्या नावे केली.




सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांची आक्रमक अर्धशतके भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली.
नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ऍरॉन फिंच व कॅमेरून ग्रीन यांनी संघाला आक्रमक सुरुवात दिली होती. ग्रीनने 21 चेंडूवर 51 धावा काढल्या मात्र, त्यानंतर मधली फळी अपयशी ठरली. अखेरीस टीम डेव्हिड व डॅनियल सॅम्स यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 186 पर्यंत मजल मारून दिली. डेव्हिडने यादरम्यान आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. भारतीय संघासाठी अष्टपैलू अक्षर पटेल याने सर्वाधिक तीन बळी टिपले.
ऑस्ट्रेलियन ठेवलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना केएल राहुल पहिल्या षटकात बाद झाला. रोहित शर्मा देखील चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकला नाही. मात्र, त्यानंतर विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढले. प्रत्येक षटकात चौकार-षटकार ठोकत त्यांनी दहा षटकात भारताला शंभरी पार नेले. सूर्यकुमारने आक्रमणाची प्रामुख्याने जबाबदारी घेत 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 36 चेंडूवर 69 धावांची एक तुफानी खेळी केली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर विराटने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. याच दरम्यान त्याने आपले 33 वे टी20 अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी थोडीफार नियंत्रित गोलंदाजी केली. मात्र, अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना विराटने पहिला चेंडूवर षटकार मारला. मात्र, पुढील चेंडूवर तो बाद झाला. त्याने 48 चेंडूंवर 63 धावा केल्या. अखेरीस हार्दिक पंड्याने एक चेंडू शिल्लक असताना चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.








