पाषाण :
पाषाण परिसरामध्ये असणाऱ्या वाकेश्वर (आखाडा) गार्डनचा रस्ताच महापालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे गायब झालेला आहे. सुसरोड परिसरातील बहुसंख्य जेष्ठ नागरिक येथे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारा व्यायाम करण्यासाठी एकत्र यायचे. परंतू वाकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी पुणे महानगरपालिकेला सदरची जागा हस्तांतरित करण्याकरिता तयारी दर्शवून देखील महापालिकेकडून मागील पाच वर्षात कोणतीच हालचाल झाली नाही परिणामी येथे सुरू असणारे अनधिकृत बांधकाम आणि व्यवसायांना बंद करण्याकरता ट्रस्ट कडून सदरची जागा पत्रा टाकून बंद करण्यात आली. परिणामी येथे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना सदरच्या गार्डनमध्ये जाण्याकरता बंधने तयार झाली.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक प्रमोद निम्हण म्हणाले, की वाकेश्वर (आखाडा) गार्डनमध्ये अनेक आणि अनधिकृत व्यवसाय आणि बांधकामे होती त्यामुळे ट्रस्टने जागा कंपाउंड घालून बंद केली आहे. वाकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पुणे मनपा जागाहस्तांतर बाबत बैठकीत मोबदला तीन टप्प्यात देण्याचे मान्य झाले होते, याची नोंद तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात आहे. परंतु 2017 ते 2022 या कालावधीत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळेच हा विषय प्रलंबित राहिला. प्रशासनाने सदर गार्डन ला जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या वाकेश्वर (आखाडा) गार्डन चा रस्ता मार्गी लावून हे आखाडा गार्डन पालिकेने त्वरित सर्वांसाठी खुले करून द्यावे. जेणे करून नागरिकांची गैरसोय थांबेल.
हास्य क्लब वाकेश्वर आखाडा गार्डन चे शाखाध्यक्ष भालचंद्र लेले म्हणाले की, वाकेश्वर गार्डनमध्ये दररोज 50 ते 60 ज्येष्ठ नागरिक व्यायाम करण्यासाठी येत होते. परंतु गेले काही महिन्यापासून जाण्याकरिता रस्ताच नसल्यामुळे आम्हा नागरिकांची गैरसोय होत आहे. जागा उपलब्ध असून देखील त्याचा वापर होत नाही याची खंत आम्हाला वाटते. सदर गार्डन साठी रस्ता उपलब्ध होऊन हे गार्डन वापरण्यासाठी खुले व्हावे अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे.
वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष आर. एल. उत्पात यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे हे गार्डन रस्ता खुला करून लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे जेणेकरून व्यायामासाठी आमची होणारी गैरसोय दूर होईल.
वाकेश्र्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वास धडपळे म्हणाले की, पुणे महापालिका जागा ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असणारा मोबदला देऊन जागा ताब्यात घेत नाही. मोबदला मिळाल्यानंतर आम्ही जागा ताब्यात देण्यास तयार आहोत.