मुंबई :
राज्यात महापालिका निवडणुकांची चाहुल लागल्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका निवडणुकीसंदर्भातील शिंदे सरकारच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना नव्याने प्रभाग रचना तयारकरण्याचे आदेश दिले आहेत.
जाणकारांच्या मते फेब्रुवारी मार्च मध्येच निवणुका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबई, पुणे सह चोवीस महानगरपालिका निवणुकीच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळेल. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई वगळता तीन सदस्यीय प्रभाग रचना राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेत आता नव्याने प्रभाग रचना अस्तित्वात येणार असून याचा मोठा परिणाम मुंबई, पुणेसह अन्य शहरातील महापालिकांवरही पडून शकतो. नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने जारी केले आहेत. त्यामुळेच येणाऱ्या पालिका निवडणुका नव्याप्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
कोरोना महामारीमुळे मुदत संपूनही गेल्या दोन वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे. अशा महापालिकांसह सध्या प्रशासकीय राजवट असलेल्या महापालिकांमध्ये येत्या काळात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि बदललेल्या प्रभाग रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
प्रभाग रचनांवरील खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने नव्या प्रभाग रचनांना जैसे थे चे आदेश दिले होते. यामुळे जुन्याच प्रभाग रचनांवर निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात असताना शिंदे सरकारने नव्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवीन मुंबई, औरंगाबादच्या निवडणूक दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक हे पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत.या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टातही केस सुरु आहे. त्याचवेळी शिंदे सरकारचा हा आदेश समोर आला आहे.