पुणे :
पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (वय ५७) यांचे (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्याच्या गॅलेस्की रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. आज सकाळी 11 वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उद्या सकाळी ९ ते ११ या वेळेत केसरीवाडा येथील राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वैकुंठ स्मशामभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत.
मुक्ता टिळक या पुणे महापालिकेच्या माजी महापौर देखील होत्या. लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत. भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून मुक्ता टिळक यांची ओळख आहे. मुक्ता टिळक या 2017 ते 2019 या काळात भाजपच्या पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यानंतर त्यांना 2019 साली भाजपच्या वतीने विधानसभेचे टिकीट देण्यात आले होते. त्या कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या.
मुक्ता टिळक या कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करत असताना देखील व्हिलचेअरवर मुंबईत येत विधान परिषदेसाठी मतदान केले होते. त्यावेळी भाजपच्या सर्वच नेत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात आले होते. मुक्ता टिळक यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.