कर्नाटक :
‘हवाई चप्पल’ घालणाऱ्या सामान्य नागरिकांना विमानाने प्रवास परवडला पाहिजे. हे वास्तवात शक्य असल्याचे मला जाणवत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर व्यक्त केले.




कर्नाटकमध्ये शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर जाहीर सभेत मोदी बोलत होते. भारतातील हवाई वाहतूक उद्योगावर प्रकाश टाकताना येत्या काही दिवसांत भारताला हजारो विमानांची गरज भासेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा उपस्थित होते. मोदींनी सांगितले, की भारतीय बनावटीचे प्रवासी विमान लवकरच उपलब्ध होणार आहे. काँग्रेसचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले, की ‘एअर इंडिया’ कंपनी २०१४ पूर्वी अनेकदा नकारात्मक कारणांमुळे चर्चेत होती आणि काँग्रेसच्या काळात घोटाळय़ांसाठी प्रसिद्ध होती. आमच्या सरकारचा भर लहान शहरांमध्येही विमानतळ उभारण्यावर आहे. सन २०१४ पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे सात दशकांत देशात केवळ ७४ विमानतळे होती, मात्र गेल्या नऊ वर्षांत ७४ नवीन विमानतळे बांधण्यात आली आहेत.








