नवी दिल्ली :
व्हिप हा राजकीय पक्षाकडून काढला जातो, विधीमंडळ गटाकडून नाही, एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सर्वप्रथम व्हिपचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर पक्षविरोधी वर्तन केलं असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.
राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असून आज ठाकरे गटाच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला. सत्तासंघर्षाची ही सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
ठाकरे गटाच्या वतीनं आतापर्यंत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. देवदत्त कामत यांनी युक्तीवाद करताना एकनाथ शिंदे यांनी उपाध्यक्षांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. ते म्हणाले की, या पत्रात केवळ विधीमंडळ पक्षाचा उल्लेख आहे, राजकीय पक्षाचा नाही, याच पत्राद्वारे प्रतोद बदलाची सूचना दिली गेली. व्हिप हा राजकीय पक्षातर्फे काढला जातो, विधीमंडळ पक्षाकडून नाही. या प्रकऱणात म्हणजे पावलोपावली घटनेची पायमल्ली झाल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सर्वप्रथम व्हिपचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर पक्षविरोधी वर्तन केलं.
राजकीय पक्ष म्हणजे विधीमंडळ पक्ष नव्हे
देवदत्त कामत म्हणाले की, राजकीय पक्षाचे निर्णय हे त्यांच्या प्रमुखाकडून घेतले जातात. तेच निर्णय प्रतोदांच्या माध्यमातून आमदारांपर्यंत पोचवले जातात. दहाव्या सूचीतही राजकीय पक्ष म्हणजे काय याची विस्तृत व्याख्या दिलीय. राजकीय पक्ष हा केवळ विधीमंडळ पक्ष नाही. अगदी गाव, तालूका, जिल्हा पातळीवर पक्षाचं अस्तित्व असतं. राजकीय पक्षाची एक रचना असते, त्याचाही दहाव्या सूचीत उल्लेख आहे. पदाधिकारी, प्रमुख नेते, अध्यक्ष असा राजकीय पक्ष असतो.
देवदत्त कामत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याची माहिती वेळोवेळी निवडणूक आयोगाला दिली होती. पक्षाच्या घटनेनुसार नेमणूका झाल्या होत्या. पक्षांतर्गत वाद असेल तर आमदारांचा एक गट आम्हीच खरा पक्ष आहोत असा पवित्रा घेऊ शकतं का? त्या पुढे जाऊन सरकार पाडलं जातं, नवं सरकार स्थापन केलं जातं आणि थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्षचिन्ह मागितलं जातं. अशा परिस्थितीत योग्य वर्तन काय असू शकलं असतं हे कोर्टाने ठरवायचं आहे.
शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी सर्वप्रथम व्हिपचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर पक्षविरोधी वर्तन केलं असा दावा देवदत्त कामत यांनी केला. दहाव्या सूचीनुसार योग्य वर्तन आणि योग्य निर्णय काय याचा निर्णय या कोर्टाने घ्यावा असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगाकडून आता शिंदे गटाला राजकीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे हे प्रकरण अधिकच किचकट बनलंय असं देवदत्त कामत म्हणाले.
तुम्ही शिवसेना आहात की नाही, असं महत्वाचं निरीक्षण देखील सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदेंच्या वकीलांना खडसावलं. तर आमदार अपात्र झाले तरी आमच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाचे वकील निरज कौल म्हणाले.
तुमच्याकडे विधिमंडळात बहुमत आहे. याचा अर्थ तुम्ही पक्ष होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने बहुमताचा दाखला देत एकनाथ शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं आहे, या पार्श्वभूमिवर न्यायालयाचे हे महत्वपूर्ण निरीक्षण आहे.