नवी दिल्ली :
देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे २० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जिल्हाधिकाऱ्यां सोबत संवाद साधणार आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असणार्या दहा राज्यांतील जिल्हाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यां सोबत पंतप्रधानांचा थेट संवादाची ही पहिलीच वेळ आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत १० राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट , कर्नाटक, पंजाब, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारचा समावेश आहे. कोरोनाविरुध्दच्य लढ्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यांचा उत्साह वाढविण्याबरोबरच प्रत्यक्ष जमीनीवर काय परिस्थिती आहे याचा आढावा पंतप्रधान या संवादातून घेणार आहेत.
कोरोनाविरुध्द उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने उच्चस्तरीय समितीच्या बैठका घेत आहेत. राज्यांच्या मु्ख्यमंत्र्यांशीही संवाद साधत आहेत. मात्र, यामध्ये प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देण्याऐवजी अनेक मुख्यमंत्री तक्रारींचा पाढाच वाचत आहेत. त्यामुळे सर्वाधिक कोरोना बाधित असणार्या जिल्हाधिकाऱ्यां सोबत संपर्क साधून उपाययोजनांचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत.
पंतप्रधान १० राज्यांतील ५४ जिल्हाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. पहिल्या टप्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, पुड्डुचेरी, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा आणि हरियाणातील जिल्हाधिकारी असतील. महाराष्ट्रातील १५, पश्चिम बंगालमधील ९, उत्तर प्रदेशातील ४, राजस्थानातील ५, ओडिशातील ३ आणि पुड्डुचेरीतील एक जिल्हाधिकारीअसणार आहे. कोरोनावर उपाययोजनांसाठी रणनिती, लसीकरण यासह अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे.