चेन्नई :
ऑस्ट्रेलियाने आपल्या भारत दौऱ्याचा शेवट गोड केला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेला पहिला वन-डे सामना गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत उर्वरित दोन्ही सामने जिंकत मालिका खिशात घातली.
चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी बाजी मारली. झॅम्पा आणि अगर हे सामन्याचे हिरो ठरले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. सलामीवीर ट्रॅविस हेड आणि मिचेल मार्श जोडीने या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला भक्कम सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताला डोईजड ठरणार असं वाटत असतानाच हार्दिक पांड्याने ट्रॅविस हेडला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ज्यानंतर हार्दिक पांड्याने ठराविक अंतराने मिचेल मार्श आणि स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत कांगारुंची अवस्था बिकट केली.
आश्वासक सुरुवातीनंतर कांगारुंची अवस्था ३ बाद ८५ अशी झाली. ज्यानंतर डेव्हीड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेनने चौथ्या विकेटसाठी पुन्हा एक भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. कुलदीप यादवने डेव्हीड वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली. या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरतो न सावरतो तोच मार्नस लाबुशेनही कुलदीपच्या फिरकीचा बळी ठरला. परंतु यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फळीतील फलंदाजांनी महत्वपूर्ण इनिंग खेळत संघाला २६९ धावांपर्यंतचा टप्पा गाठून दिला. भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३-३ तर सिराज आणि अक्षर पटेलने २-२ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने डावाची आक्रमक सुरुवात केली. रोहित आणि शुबमन गिलने आक्रमक फटके खेळत पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असतानाच सिन अबॉटने रोहित शर्माला बाद केलं. रोहितने ३० धावा केल्या. ठराविक अंतराने झॅम्पाने शुबमन गिललाही माघारी धाडत भारताला दुसरा धक्का दिला. ज्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव सावरला.
विराट आणि लोकेश राहुलने संघाची पडझड रोखत फटकेबाजीला सुरुवात केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. झॅम्पाने लोकेश राहुलला बाद करत भारताची जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेला अक्षर पटेलही फारशी चमक दाखवू शकला नाही. ज्यानंतर विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या साथीने पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या भागीदारीमुळे भारताला विजयाची आशा दिसायला लागली असताना अगरने विराटला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली.
विराटनंतर सूर्यकुमार यादवही लगेच माघारी परतला. अगरने त्याचा त्रिफळा उडवला. तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव भोपळाही फोडू शकला नाही. ज्यानंतर हार्दिक पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरत संघाला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. परंतु झॅम्पाने मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या आणि त्यानंतर रविंद्र जाडेजाला माघारी धाडत भारताला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकललं. ज्यानंतर अखेरच्या फळीतले फलंदाज विजयासाठीचं आव्हान पूर्ण करु शकले नाही. भारताचा डाव २४८ धावांत गुंडाळत ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी सामना जिंकत मालिकाही २-१ च्या फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पाने ४, अगरने २ तर स्टॉयनिस आणि अबॉटने १-१ विकेट घेत त्यांना उत्तम साथ दिली.