पुण्यात बांधकाम, उद्याने, मैदाने आणि वॉशिंग सेंटरसाठी एसटीपीच्याच पाण्याचा वापर बंधनकारक ?

0
slider_4552

पुणे :

भविष्यातील पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून महापालिकेने आतापासूनच पाण्याच्या पुनर्वापराचा गांभीर्यान विचार सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून मैलापाणी प्रक्रिया केंद्रांमधील पाण्याचा वापर बांधकाम, उद्याने, मैदाने, उद्योग, वॉशिंग सेंटरसारख्या ठिकाणी करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. तसेच अधिकाअधिक मैलापाण्यावर एनजीटीच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रक्रिया करण्यासाठी शहरातील तीन जुने एसटीपी प्लांट पाडून नव्याने बांधण्यासोबतच समाविष्ट २३ गावांमध्ये आणखी ८ प्लांटस्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

यंदा पावसाळा लांबला आहे. धरणसाखळीत ५ टीएमसी पाणीसाठा आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तीन आठवड्यांपासून आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद ठेवायला सुरूवात केली आहे. त्याचवेळी बांधकामांसाठी पिण्याचे अथवा बोअर व विहीरींचे पाणी वापरण्यास बंदी केली आहे. त्याऐवजी महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधील पाणी मोफत उपलब्ध करून दिले आहे. जे बांधकाम व्यावसायीक हे पाणी वापरणार नाही त्यांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून दररोज २ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होत आहे. हा धागा पकडत आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, की लोकसंख्या वाढत असताना पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत जाणार आहे. यासाठी पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

महापालिका हद्दीत निर्माण होणार्‍या संपुर्ण मैलापाण्यावर एनजीटीच्या नॉर्म्सनुसार प्रक्रिया झाल्यानंतर ते पाणी बांधकाम, उद्याने, हिरवळीची मैदाने, वॉशिंग सेंटरसाठी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

यातून दरवर्षी काही टीएमसी पिण्याचे पाणी आणि ग्राउंड वॉटरची बचत होउन नागरिकांना पिण्यासाठी व अत्यावश्यक वापरासाठी देणे शक्य होणार आहे.

तसेच मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेअंतर्गतही नदीपात्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी सोडून कमीत कमी प्रदूषण राखण्यासाठी मदत होणार आहे. याची सुरुवात महापालिकेने स्वत:पासून केली असून यापुढील काळात शहरातील उद्याने आणि मैदानांना, दुभाजकांवरील झाडांसाठी केवळ एसटीपी प्लांटस्चेच पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.

See also  मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड वतीने वारजे येथे आर्थिक साक्षरता प्रकल्प राबविला गेला..