पुणे :
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. खटले दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकांना तडजोड खटल्याकरीता न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वेळेवेळी कळविण्यात आले होते. मात्र, जे वाहन चालक न्यायालयात हजर राहिले नाहीत अशा वाहन धारकांवर पकड वॉरंट जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) ए.जी बोत्रे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक विभागाने 2020 पासून वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर तडजोड खटल्याकरीता न्यायालयासमोर वेळोवेळी उपस्थित राहिले नाहीत. अशा वाहन धारकांवर मोटार वाहन न्यायालय पुणे याठिकाणी खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने संबंधित वाहनधारकांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र वाहनधारकांनी वाहतूक विभाग अथवा न्यायालयात तडजोड केलेली नाही, अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात कोर्टात प्रलंबित आहे. यापार्श्वभूमीवर मोटार वाहन न्यायालयाने अशा वाहनधारकांवर पकड वॉरंट जारी केले आहे. पहिल्या टप्प्यात 732 वॉरंट वाहतूक विभागाला प्राप्त झालेली आहेत.
पकड वॉरंज जारी करण्यात आलेल्या वाहनधारकाने आठ दिवसांमध्ये मोटार वाहन न्यायालयात उपस्थित राहून खटल्याचा निकाल लावून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पोलीस विभागाकडून वाहनधारकाला अटक करुन न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जे वाहनधारक न्यायालयात हजर झाले नाहीत त्यांनी तडजोड करुन घ्यावी असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे