ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच घेतल्या प्रकरणी अटक

0
slider_4552

पुणे :

वैद्यकिय देयकामधे त्रुटी न काढता फाईल पूर्ण करून देण्याकरिता अडीच हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत करण्यात आली.

गणेश सुरेश गायकवाड (वय 49, वरिष्ठ लिपिक (वर्ग-3), अधीक्षक कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांचे एक लाख सात हजार रुपयांचे वैद्यकीय देयक फाईल मंजुरीकरिता वैद्यकीय अवाक जावक विभाग, अधीक्षक कार्यालय, ससून हॉस्पिटल येथे 21 जुलै रोजी सादर करण्यात आले होते. त्या वैद्यकिय देयकामधे त्रुटी न काढता फाईल पूर्ण करून देण्याकरिता वरिष्ठ लिपिक गणेश गायकवाड याने तीन हजार रुपयांची मागणी केली.

त्यानंतर याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने श बुधवारी (दि. 9) या प्रकरणी पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत चौथ्या मजल्यावर सापळा लावला.

आरोपीने तडजोडीअंती फिर्यादीकडून अडीच हजार रुपये लाच घेतली. लाच घेत असताना एसीबीने गायकवाड यास रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस अंमलदार सरिता वेताळ, रियाज शेख, प्रविण तावरे, पांडुरंग माळी यांनी केली.

See also  इतिहासाची माहिती नसलेल्या लोकांनी काहीतरी बोलून समाजात गैरसमज निर्माण करू नयेत : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे