९५% जमीन मालकांनी पीएमआरडीए ला दिली संमत्ती
पुणे :
चांदणी चौकाची अडचण सुटल्या नंतर आता पुणे – कोलाड रस्त्यावरील अत्यंत महत्वाच्या भूगाव बाह्यवळण मार्गाची अडचण लवकरच दूर होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात दर्शविलेला १८ मीटर रुंदीचा व ८०० मीटर लांबीच्या भूगाव बाह्यवळण मार्गासाठी १.४४ हेक्टर जमिनीची गरज आहे. या साठी एकूण ४१ जमीन मालक खातेदार यांची संमती आवश्यक होती त्यापैकी ३७ भूखंडधारकांनी चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) अथवा विकसन हक्क निर्देशांकाच्या (TDR) मोबदल्यात जमिनीचा आगाऊ ताब्याचे संमतीपत्रावर स्वाक्षरी केली आहे. सदरील रस्ता हा चांदणी चौक ते कोलाड (जिल्हा रायगड) या मार्गावरील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे.







सदरच्या जमीन अधिग्रहणाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने करून जागा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्त करून दिल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या (NHAI) मदतीने सदरील रस्त्याचे बांधकाम करणार आहे. ९५% क्षेत्राचे संमतीपत pmrda ला प्राप्त झाल्याने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यास सोपे झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूगाव बाह्यवळणाच्या रस्त्याचे काम मार्गी लागेल. सदरील रस्त्याच्या जमीन अधिग्रहणाची संमती प्राप्त करून घेण्याचे काम मुख्य अभियंता अशोक भालकर यांचे मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता अमित तिडके व सहाय्यक नगररचनाकार विवेक डूब्बेवार यांनी पाहिले. या कामासाठी ग्रामपंचायत भूगाव यांचे सह स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य लाभले.
“भूगाव बाह्यवळण रस्त्याचे कामासाठी जमीन मालकांची आगाऊ ताबा संमती मिळाल्याने सदरचे क्षेत्र लवकरच रस्ते विकास महामंडळाचे ताब्यात देवून पुढील कार्यवाही सुरु होईल त्यामुळे या रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास निश्चित मदत होईल.”
– राहुल महिवाल, महानगर आयुक्त, PMRDA








