आपल्यामध्ये असणारी नैपुण्यता कौशल्य वापरून उत्कृष्ट काम करा जे देशसेवेच्या उपयोगी येईल : अविनाश धर्माधिकारी

0
slider_4552

बाणेर :

आपल्या संस्कृतीत नमस्ते म्हणण्यामध्ये एक चैतन्य आहे. माझ्यामध्ये चैतन्य आहे, व तुमच्या मध्येही चैतन्य आहे. माझ्या चैतन्याने तुमच्या चैतन्याला नमस्ते म्हटले आहे. या चैतन्यातील स्वयंभूपणामुळे आपण सुरक्षित असल्याचे लक्षात येते. देश सुरक्षित राहण्याकरता तुम्ही स्वयंभू होणे हा सुरक्षेचा भाग आहे. तुमच्यामध्ये असणारी नैपुन्यता, कौशल्य अशा उत्कृष्ट प्रकारे पणाला लावा की आपले काम सर्वात उत्कृष्ट झाले पाहिजे व या कामात देशाचा फायदा व्हावा हीच आपली देशसेवा आहे, असे प्रतिपादन चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहांमध्ये श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्षाबंधन एक सामाजिक सुरक्षा या परिसंवाद कार्यक्रमात आपले मत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी निवृत्त पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे, लोकमतचे संपादक संजय आवटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीकांत पाटील, अशोक मुरकुटे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, सुभाष गायकवाड, पुणे बारच्या उपाध्यक्षा अँड. जयश्री बिडकर, सौरभ देशपांडे योगेश कुलकर्णी, अनिल चैतन्य, अतुल नाडगौडा, अभिजीत भिडे आदी उपस्थित होते.

या परिसंवादाप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, परिसंवादासाठी घेण्यात आलेला रक्षाबंधन हा विषय छान आहे. प्रेम आणि पराक्रमाचे हे नाते असल्याने याचे सामाजिककरण होऊन कुटुंबातील प्रेम वाढले पाहिजे. आपल्या बहिणी बरोबरच समाजात फिरत असलेल्या इतर स्त्रिया कडेही बघण्याचा दृष्टिकोन बदलला की समाजात घडणाऱ्या विकृती कमी होतील व आपली संस्कृती टिकून राहील.

भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, पूर्वी जसे प्रत्येक कुटुंबात संस्कार घडवले जात होते. तसे सध्याही घडवले गेले पाहिजेत. सध्याच्या इंटरनेटच्या आणि ईमेलच्या अशा सगळ्या डिजिटल स्पर्धेच्या युगात आपण मुलांना संस्कार देणे विसरत आहोत. हे संस्कार प्रत्येक युवा पिढीला मिळाले तर देशात बदल घडू शकतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे संस्थापक अँड. श्रीकांत पाटील म्हणाले की, रक्षाबंधन की संस्कृतीने दिलेली देणगी आहे. रक्षाबंधनातून आपली दृष्टी बदलते, बहिण भावाला ओवाळणे वेगळी दृष्टी आहे. ही साधी क्रिया नसून दृष्टी बदलणारी क्रिया आहे. त्यामुळे बहीण निर्भय होऊन समाजात वागू शकते. प्रत्येक स्त्रीबाबत हीच दृष्टी पुरुषांनी वापरून स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे.

See also  ‘करिअर कट्टा’ स्पर्धेत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक

या कार्यक्रमाप्रसंगी औंध, बाणेर परिसरातील नागरिक तसेच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. गंधाली भिडे यांनी केले तर आभार श्रुती कुलकर्णी यांनी मानले.