पुणे :
वाहतूक शाखेच्या येरवडा येथील (Pune) वाहतूक शाखेच्या कार्यालयात सुरू केलेल्या मदत कक्षाला (हेल्पडेस्क) नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सात दिवसांत वाहनचालकांनी 1 हजार 798 वाहनचालकांनी 41 लाख रुपयांहून अधिक तडजोड शुल्क भरले आहे.
झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे, सिग्नलचे उल्लंघन, हेल्मेट परिधान न करणे, सीटबेल्ट न बांधणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष आणि सीसीटीव्हीद्वारे ही कारवाई केली जाते.
परंतु अनेक वाहनचालकांनी अद्याप दंड भरलेला नाही. त्या वाहनचालकांना तडजोड करून शुल्क भरता येणार आहे. वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात 28 ऑगस्टपासून ‘हेल्पडेस्क’ सुरू केला आहे. वाहनचालकांनी चलन आणि आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीसह ‘हेल्पडेस्क’शी संपर्क साधावा. या अभियानास वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा हेल्पडेस्क आठ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. 9 सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे.- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा.
अद्याप ही 30 कोटी रुपये थकीत –
एक जानेवारीपासून 31 ऑगस्ट 2023 अखेर वाहतूक शाखेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा लाख 99 हजार 879 वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांना 44 कोटी 26 लाख 59हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
त्यापैकी दोन लाख 48 हजार 240 वाहनचालकांनी 14 कोटी 22 लाख 69 हजार रुपये दंडाची रक्कम भरली आहे. उर्वरित चार लाख 51 हजार 639 वाहनचालकांकडे सुमारे 30 कोटींहून अधिक दंडाची रक्कम थकीत आहे.