दिल्ली :
दिल्लीत मोठ्या दिमाखात G20 शिखर परिषद होत आहे. या परिषदेसाठी भारतात प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आगमन झाले आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
जो बायडेन यांच्यासह विविध देशातील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष देखील भारतात दाखल झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचेही भारतात आगमन झाले आहे.
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठक पार पडली. तर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोही दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचे स्वागत केले.
नवी दिल्ली येथे 8 आणि 9 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषद पार पडणार आहेत. यासाठी बाहेरील देशातील उच्च पदावरील मंडळी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी दिल्ली परिसरात रात्रीपासूनच निर्बंध लागू झाले आहेत.
अनेक रस्ते वळवले असून दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे, की तुम्ही दिल्लीत कुठेही जात असाल तर आधी ट्रॅफिक अॅडव्हायझरी वाचा. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 5 ते 10 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत नवी दिल्लीचा संपूर्ण परिसर ‘नियंत्रित’ राहील. सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन वगळता सर्व स्थानकांवर प्रवाशांसाठी मेट्रो उपलब्ध असेल