मुंबई :
मनुष्यबळाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मुंबई पोलीस दलात 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे. याअंतर्गत राज्य सुरक्षा महामंडळामार्फत 3000 कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. याबाबत गृह विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 3000 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेकडून (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ) घेण्यास 27 जुलै 2023 रोजी शासनाने मान्यता दिली आहे. मुंबई पोलीस दलात तातडीने मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाल्याचे पोलीस आयुक्तांनी शासनाला कळवले होते. त्यानुसार गृह विभागाने ही पोलीस शिपाई पदावरील कंत्राटी भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे.
बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याचा कालावधी अथवा 11 महिने यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीसाठी ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. कंत्राटी भरती करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला शासनाकडून 29 कोटी 58 लाख 96 हजार 40 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे.
आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात बंदोबस्तासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्यामुळे ही भरती केली जाणार आहे. 11 महिन्यांचे हे कंत्राट असून त्यानंतर हे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रुजू होतील. यासाठी एकूण 100 कोटी 21 लाख 45 हजार 580 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.