पुणे :
पुण्यातील ससून रुण्णालयात उपचार घेणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून गेल्याने आता हे प्रकरण शासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाना साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मंत्र्यांकडून प्रकरणाची चौकशी होईपर्यंत राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून काँग्रेसनं राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांच्या तावडीतून एखादा कुख्यात आरोपी सहज पळून जाणे, ही बाब पुणे पोलिसांसाठी लाजिरवाणी आहे. या गंभीर आणि संशयास्पद प्रकरणात आरोपी ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयातील सहा डॉक्टरांची तसंच पोलिसांची, ससून अधिष्ठाता आणि संबंधित स्टाफची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी व्हावी. तसंच संशयाच्या भोवऱ्यात आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि अकार्यक्षम आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ड्रगच्या तस्करीतील पैसा मंत्र्यांना :
यासंदर्भात बोलताना सुरवसे-पाटील म्हणाले, ललित पाटील याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करून घ्या, असा फोन दादा भुसेंनी अधिष्ठाता यांना केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही केला आहे. ससूनसारख्या मोठ्या रुग्णालयात कुख्यात आरोपीवर नऊ महिने नेमके कसले उपचार केले जात होते? उपचाराच्या नावाखाली रुग्णालयातून ललित पाटील याचा पाहुणचार होत होता आणि ससूनमधूनच कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी सुरू होती. या तस्करीतील पैसा सरकारमधील मंत्री, ससून प्रशासन आणि पोलिसांना देखील जात असल्याचा संशय आम्हाला आहे, असे सुरवसे-पाटील म्हणाले.
निवेदनातून ही मागणी :
ड्रग्ज माफिया आरोपी ललित पाटील याला पोलीस आणि रुग्णालय प्रशासनातील काही जणांचे निश्चितपणे सहकार्य होत होते. तो पळून जाण्यामध्ये देखील ह्याच लोकांनी मदत केली असून शिंदे-फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा आरोपीला आशीर्वाद आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ससूनमधील डॉक्टर, पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री दादा भुसे यांचे सीडीआर तपासले जावेत. त्यातून अधिकची माहिती तपास यंत्रणाच्या हाती लागू शकते. या गंभीर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दादा भुसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे, असंही निवेदनात म्हटलं आहे.
सावंत व भुसेंचा राजीनामा घ्या, अन्यथा आंदोलन :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गलथान कारभाराने राज्याची अब्रू गेली आहे. राज्यातील सर्वच विभागात गोंधळ सुरू आहे. आरोग्य यंत्रणेची पुरती वाट लागली असून शासकीय रुग्णालयांच्या बदनामी आडून खासगीकरण करण्याचा या सरकारचा डाव असू शकतो. आरोग्यमंत्री तानाजी सावंत व ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी संबंधित असणारे मंत्री दादा भुसे यांचा तत्काळ राजीनामा घेतला नाही, तर सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असं यावेळी सुरवसे-पाटील म्हणाले.
ललितला रुग्णालयात पंचतारांकित सुविधा :
या प्रकरणी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला फाशी द्या तसंच जे कोणी मंत्री यात सहभागी असेल त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, ससून हॉस्पिटलमध्ये ललित पाटील हा 19 महिन्यांपासून राहत होता. त्याला पंचतारांकित सुविधा या मिळत होत्या. साधारणतः हा एखाद्या रुग्णालयात एखादा रुग्ण हा कमीत कमी 4 किंवा जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस राहू शकतो. पण हा ललित पाटील गेल्या 19 महिन्यांपासून राहत होता हे संशयास्पद आहे. ससून हॉस्पिटलमध्ये ललित पाटील कडून 2 लाख रुपयांचे वाटप होत होते. ज्यात पोलीस अधिकारी, डॉक्टर, कारागृहातील अधिकारी यांचा वाटा होता, असा आरोप यावेळी धंगेकर यांनी केला आहे.
गृहमंत्री, आरोग्यमंत्र्याची चुप्पी :
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर जो आरोप केला आहे तो जर खरा असेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा. तसंच या प्रकरणी गृहमंत्री आरोग्य मंत्री हे देखील यावर काहीही बोलायला तयार नाहीत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे या सरकारचं काहीही लक्ष नसल्याची टीका यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.