चौंडी :
धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन उभारले असून यासाठी राज्य शासनाने दिलेली मुदत संपत आल्याने धनगर समाज पुन्हा आंदोलनासाठी उतरला आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजातील आंदोलकांच्यावतीने चौंडीमध्ये २१ दिवसांचे आमरण उपोषण आंदोलन सुरु केलं होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यांच्याकडून ५० दिवसांच्या आत अहवाल घेऊन तांत्रिक बाजू पूर्ण करण्यात येईल. धनगर आरक्षणामधल्या अडचणी दूर करण्यात येतील आणि आरक्षणाचा मार्ग सुकर होईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.
*आजपासून उपोषण*
यशवंत सेनेच्यावतीने या ठिकाणी राज्य सरकारने उपोषण सोडवण्यासाठी पहिल्यांदाच लेखी आश्वासन दिले होते, की आम्हाला वेळ द्या अभ्यास करून धनगर आरक्षण बाबत तोडगा काढू. त्यासाठी सरकारने पन्नास दिवसाचे वेळ घेतला. मात्र त्यानंतर अद्याप काहीही हालचाल नाही. त्यामुळे आता पुन्हा चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने आज १६ नोहेंबरपासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दौलतडे यांनी सांगितले आहे.