पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 1109 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. रविवारी या केंद्रांवर सकाळपासून पोलिओ लसीकरण होणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले होते. त्यानुसार राज्यात 1995 पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.गेली 25 वर्षे सातत्याने पोलिओ निर्मुलनाकरीता आपण सर्वजण योगदान देत आहात.आपल्या अथक परिश्रमामुळेच भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळुन आलेला नाही.
भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेमार्फत मिळालेले आहे.सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंअंतर्गत 0-5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे या तीन प्रमुख आधारस्तंभावर पोलिओ निर्मूलनाची यशस्विता अवलंबून आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा परिसरामध्ये केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार रविवार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे केले आहे. सदर मोहिमेत 3 मार्च रोजी बुथवर सकाळी 8 ते सांय 5 यावेळेत पोलिओ लसीकरण करण्यात येईल. मनपा परिसरात 1109 लसीकरण केंद्रांमार्फत 8 विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 75 वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली 255 पर्यंवेक्षक व 3203 लसीकरण लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम,बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
महानगरपालिकेने शहरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 1109 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा 963 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन,मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी 54 ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 81 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणाऱ्या ५ वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.