मावळ लोकसभेसाठी आवश्यक मनुष्यबळाची तिसरी सरमिसळ

0
slider_4552

मावळ :

मावळ लोकसभेसाठी 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या मनुष्यबळाची तिसरी सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे,

निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी प्रमोद ओंभासे, संपर्क अधिकारी सचिन चाटे, पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्राचे समन्वय अधिकारी सागर पासलकर, अजित जोगळेकर, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, सचिन मस्के, मनिषा तेलभाते, मावळ, चिंचवड, पिंपरी, पनवेल, उरण तसेच कर्जत विधानसभा निवडणूक कार्यालयातील मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी अनुक्रमे एस. ए मलबारी, किरणकुमार मोरे, मनोज लोणकर, विनोद लचके, प्रशांत आंबिलकर तसेच सचिन राऊत आदी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 544 मतदान केंद्रे, कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये 339 मतदान केंद्रे, उरण विधानसभा मतदारसंघामध्ये 344 मतदान केंद्रे, मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 390 मतदान केंद्रे, चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 549 मतदान केंद्रे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये 400 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 11 हजार 848 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये 2 हजार 852 मतदान केंद्राध्यक्ष, 8 हजार 556 मतदान अधिकारी यांच्यासह 76 सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश असून सर्व विधानसभा मतदारसंघाना आवश्यक अधिकारी कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला आहे.

See also  पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्याला खंडणीविरोधी पथकाने औंध येथे रंगेहात पकडले.

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी 603 मतदान केंद्राध्यक्ष, 1 हजार 809 मतदान अधिकारी तसेच 3 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी 377 मतदान केंद्राध्यक्ष, 1 हजार 131 मतदान अधिकारी तसेच 29 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण विधानसभा मतदारसंघासाठी 382 मतदान केंद्राध्यक्ष, 1 हजार 146 मतदान अधिकारी तसेच 21 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी 435 मतदान केंद्राध्यक्ष, 1 हजार 305 मतदान अधिकारी तसेच 4 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 609 मतदान केंद्राध्यक्ष, 1 हजार 827 मतदान अधिकारी तसेच 14 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी 446 मतदान केंद्राध्यक्ष, 1 हजार 338 मतदान अधिकारी तसेच 5 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना रविवार दि. 12 मे 2024 रोजी विधानसभा निवडणूक कार्यालयनिहाय निश्चित केलेल्या स्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

त्यानंतर मतदान साहित्य त्यांच्याकडे सुपूर्त केले जाईल. सायंकाळपर्यंत मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक त्यांना नेमून दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी पोहचतील असे नियोजन करण्यात आले आहे.

सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच आपसात समन्वय ठेवून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी दिले.