पुणे :
पुणे शहरातील विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आजपासून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
पुणे विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
*मुख्य बदल:*
न्यू एअरपोर्ट रस्त्यावर, पुणे विमानतळाकडून रामवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकामध्ये उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.
*पर्यायी मार्ग* :
वाहन चालकांनी दोराबजी मॉल चौकातून यू-टर्न घेऊन पुढे जावे. किंवा एअरपोर्ट चौकातून पेट्रोल साठा चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खालील बदल करण्यात आले आहेत:
1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी:
बाणेर पाषाण लिंक रस्त्याने विद्यापीठाकडे जाणारे वाहनचालक ४५ आयकॉन आयटी कंपनीसमोरून यू-टर्न घेऊन हॉटेल महाबळेश्वर चौकातून विद्यापीठ मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.
2. बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्त्याकडे जाण्यासाठी:
बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्त्याकडे जाणारे वाहनचालक माऊली पेट्रोल पंपाकडून यू-टर्न घेऊन पुन्हा महाबळेश्वर हॉटेल चौकात येतील. तेथून डावीकडे वळून बाणेर पाषाण लिंकमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.
खराडी बायपास मार्गे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती:
*बदल* :
खराडी दर्गा चौकातून उजवीकडे वळून खराडी गाव किंवा युआन आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
*पर्यायी मार्ग:*
वाहनचालकांनी खराडी बायपास चौकातून सरळ पुढे जावे आणि २५० मीटर अंतरावर ‘आपले घर’ बसस्थानकाजवळ यू-टर्न घ्यावा. त्यानंतर खराडी दर्गा चौकात डावीकडे वळून इच्छित स्थळी जाता येईल.