पुणे :
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि वृक्षलागवडीची जनजागृती करण्यासाठी इन्नर व्हील क्लब पुणे इम्पीरियलने ‘चाकांवर हरित जनजागृती’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला. या प्रकल्पाचा शुभारंभ डिस्ट्रिक्ट चेअरमन ३१३ डॉ. आशा देशपांडे आणि क्लबच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता दास यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट व्हाइस चेअरमन डॉ. दीपशिखा पाठक, पीडीसी मुक्ती पानसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेत चार ऑटो-रिक्शांवर हरित संदेश लिहिलेली आकर्षक बॅनर्स लावण्यात आली. बॅनर्सवर इन्नर व्हीलचे लोगो व वेबसाईटची माहिती देण्यात आली होती. शहरातील नागरिकांना हरित उपक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शाश्वत विकासाची दिशा दाखविणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.
या अभिनव कल्पनेची मांडणी आय.पी.पी. सुधा भाट आणि उपाध्यक्ष प्रीती परदेशी यांनी केली. प्रकल्पाचे यशस्वी आयोजन अध्यक्षा डॉ. निवेदिता दास, झोनल सर्व्हिस कमिटी पी.पी. भाग्यश्री शास्त्री व संपादक योगिनी पेंडसे यांनी केले. या वेळी क्लबच्या ३६ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शंभर वर्षांचा वारसा लाभलेले इन्नर व्हील हे जगातील सर्वात मोठे महिला स्वयंसेवी संघटन असून वंचित घटकांसाठी काम करताना पर्यावरण, युवक विकास, महिला सक्षमीकरण, वृद्धत्व व सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती यांसारख्या अनेक क्षेत्रांत सक्रिय आहे.