पुणे :
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागावर ओढवलेल्या भीषण पुरस्थितीमुळे शेकडो शेतकरी कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीत समाजातील विविध घटक मदतीसाठी पुढे येत असताना पुण्यातील प्रमुख शिक्षणसंस्था प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने समाजकार्यासाठीची आपली परंपरा पुढे नेत एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी पुढाकार घेतला आहे.




१४ नोव्हेंबर २०२५ रोजी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रु. ३०,००,०००/- (तीस लाख रुपये) इतक्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी सुपूर्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन र. एकबोटे, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे उपस्थित होते.
यावेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमधे संस्थेने मराठवाड्यातील शेतकरी पुरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी संस्थेतील कर्मचार्यांना आवाहन केले. या अवहानाला प्रतिसाद देत संस्थेतील४५०० हून अधिक शिक्षक व कर्मचारी — अनुदानित, विना अनुदानित, अध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी — यांनी मनापासून सहभागी होऊन आपला एक दिवसाचा पगार देत समाजाप्रती असलेली बांधिलकी दृढ केली.
डाॅ गजानन र. एकबोटे म्हणाले,” प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची ४५०० कर्मचाऱ्यांची मोठी शैक्षणिक फौज समाजकार्यात सदैव आघाडीवर असते. पुरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. या भावनेतूनच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत एक दिवसाचा पगार अर्पण केला. संकटाच्या काळात समाजाबरोबर ठामपणे उभे राहणे हीच आमची परंपरा आहे, ती पुढेही कायम राहील.”
धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले : “शिक्षणक्षेत्रातील ४५०० कर्मचाऱ्यांनी सामूहिक भावनेने दिलेली मदत समाजासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षकवर्ग हा समाजसेवेचा आदर्श स्वतःच्या वर्तणुकीतून घालून देत आहे.” त्यांनी सोसायटीच्या ८ ऑटोनॉमस महाविद्यालयांच्या मॉडेलचेही विशेष कौतुक केले. “संस्थेची सामाजिक बांधिलकी हि कर्मचाऱ्यांचा एकजूटीचा संदेश आहे. आफतग्रस्तांसाठीची मानवी संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे अशा उदाहरणामुळे विद्यार्थ्यांना समाजसेवेचा एक आदर्श संस्था घालून देत आहे असे ते म्हणाले.








