पुणे :
राज्यातील पुण्यासह सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढतील, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुण्यातील पुलाची वाडी येथील शिवसेना भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. ” शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुण्यात सांगितलं.
“पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु” एकत्र निवडणुका लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.
ज्या शहरात… ज्या पालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. तिथे त्या पक्षाने नेतृत्व करावं. इतरांनी त्यांच्या नेतृत्वात लढावं. हा आमचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याने या पालिका निवडणुकीत शिवसेना नेतृत्व करेल. आघाडीतील इतर पक्ष शिवसेनेसोबत येतील, असं राऊत म्हणाले.