पुणे :
विद्यापीठ- अॅस्ट्राझेनेका यांची लस विकसित करत असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे कोविड-१९ लसीकरणाची मोहीम भारतात जानेवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. या लसीच्या आणीबाणीकालीन वापरासाठी चालू महिना अखेपर्यंत आपल्याला परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ऑक्टोबर २०२१ पर्यंत भारतातील प्रत्येकाचे लसीकरण होईल आणि त्यानंतर सामान्य जीवन पुन्हा सुरळीत होईल अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे पूनावाला यांनी एका परिषदेत बोलताना सांगितले.
या महिनाअखेर आम्हाला करोना लशीच्या आणीबाणीच्या वापरासाठी परवाना मिळू शकेल, मात्र मोठय़ा प्रमाणावर वापरासाठीचा प्रत्यक्ष परवाना नंतर मिळेल. तथापि, औषध नियंत्रकांनी परवानगी दिल्यास भारतातील लसीकरणाची मोहीम जानेवारी २०२१ पर्यंत सुरू होऊ शकेल, असेही पूनावाला म्हणाले.
कोविड-१९ च्या भारतातील लशींच्या वापरासाठी ३ केलेल्या अर्जाची विषय तज्ज्ञ समिती (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी- एसईसी पडताळणी करत आहे. सध्या सुरू असलेल्या नैदानिक चाचण्यांमधील सुरक्षा व परिणामकारकता याबाबत उशिराच्या टप्प्यातील अतिरिक्त माहिती द्यावी, असे त्यांनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया व भारत बायोटेक यांना सांगितले होते.
२० टक्के लोकांना लस मिळाली, की सर्वाचा आत्मविश्वास परत येत असल्याचे दिसेल, असा आशावाद पूनावाला यांनी व्यक्त केली.